All News

राज्यात टाळेबंदीचे निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम

राज्यात टाळेबंदीचे निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम

मुंबई, दि. ३० डिसेंबर : जगावर असणारे कोरोनाचे संकट टळण्याकडे लक्ष लागले असतानाच नव्या कोरोनावताराचे सावट गडद होऊ लागले आहे. भारतातही मंगळवारी कोरोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सरकारने राज्यात 31 जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असे जाहीर केले आहे.


राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले, तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात असले, तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात 31 जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे.  


राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील टाळेबंदी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. याआधी 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारीपर्यंत लागू राहतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरू राहणार आहेत. 


देशात कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ आणि बळींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. देशभरात मंगळवारी 16 हजार पाचशे रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाख 68 हजार 581 आहे. इतर देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असली, तरी नव्या कोरोनामुळे आपण आणखी खबरदारी घ्यायला हवी, असे मत निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS