मुंबई, दि.४ मे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले असताना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद रंगत आहे. लसींचा अपव्यय केल्याचा आरोप करत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. या आरोपाला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले असून जावडेकर खोटारडे असून, त्यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे.
’प्रकाश जावडेकरजी, महाराष्ट्रातील लसींचा अपव्यय 0.22 टक्के आहे, तुमच्या खोटेपणानुसार 6 टक्के नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचार्यांचा अभिमान आहे, ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लसींचा कमीतकमी अपव्यय ठेवला,’ असे ट्वीट काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी केले आहे. सावंत यांनी जावडेकर यांच्यावर पलटवार करताना त्यांना एक सल्लाही दिला आहे. ’दु:ख याचे वाटते, की भाजपचे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करत आहेत. गंभीर बाब - महाराष्ट्रात फक्त 23 हजार 547 लसी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लसी देत नसतील, तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी देण्यास सांगा,’ असे सावंत यांनी म्हटले आहे.
’भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला, त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टीका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती,’ अशी खरमरीत टीका सावंत यांनी केली आहे.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.