All News

स्थलांतरित मजूर परतू लागले...

स्थलांतरित मजूर परतू लागले...

मुंबई, दि. ३ एप्रिल  : टाळेबंदी हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर टाळेबंदीला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीफेसबुक लाइव्हदरम्यान दिला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावाची वाट धरली असून, घरी जाणार्‍या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. 


दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा टाळेबंदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाळेबंदीच्या भीतीमुळे हातावर पोट असणार्‍यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच यापूर्वीच्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगार पुन्हा घरची वाट धरू लागले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल तर पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या 20 रेल्वेसेवा चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा या ठिकाणी जातात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4