All News

"प्रसंगोचित वक्तृत्वाचा आदर्श नमुना!"

"प्रसंगोचित वक्तृत्वाचा आदर्श नमुना!"

पंतप्रधानांचं आजचं  भाषण त्यांची उंची आणि दर्जा दर्शवणारं होतं. त्यांचं नेतृत्व केवळ 'आक्रमक' नसून ते किती  'अभ्यासू' आहे याचं आज दर्शन घडलं. श्रीरामांचा सामाजिक संदेश सांगताना, श्रीरामाच्या मुखातील चार पाच पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या. प्रत्येक ओळीपाठोपाठ तिचा अर्थ! ''वृध्द, बाल व वैद्यकीय चिकित्सक यांचं रक्षण होणं गरजेचं  आहे'' या रामवाक्याचा संदर्भ त्यांनी 'करोनातून' मिळालेल्या धड्याशी नेऊन भिडवला. वेगवेगळ्या प्रदेशात- देशात कोणकोणती 'रामायणे' प्रचलित आहेत याचा त्यांनी घेतलेला आढावा अवाक करणारा होता.
तमीळ भाषेतील रामायणाबद्दल सांगताना, त्यातलं एक वचन त्यांनी सहजगत्या उच्चारलं.  'मर्यादा' हे श्रीरामांचं व्यवच्छेदक लक्षण,  'आजच्या समारंभातील आटोपशीरपणाशी व सुप्रिम कोर्टाच्या निकालांनतरच्या संयत प्रतिक्रियेशी' किती छान जोडून घेतलं.
एकाच अर्थाचे विविध शब्द वापरणं ही तर त्यांची खासियत! त्यामुळे भाषण समृद्ध आणि संपृक्त होतं.
श्रीरामांची वाक्यं सांगताना,
"श्रीरामका 'संदेश' है..."
"श्रीरामका 'आदेश' है..."
"श्रीरामका 'निर्देश' है.."
असे समानार्थी शब्दप्रयोग ते करतात. ऐतिहासिक उदाहरणे एकामागून एक देताना कालानुक्रम चुकत नाहीत. दोन अनुप्रासी शब्दांच्या जोड्या जमवणं त्यांना खूप आवडतं...  आज संपूर्ण भारत 'राममय' आहे हे सांगताना त्यांनी ज्या गावांची नावं घेतली त्यात अनुप्रास होता..नादमयता होती..
'लक्षद्वीप'से 'लेह' तक...
'अंदमान'से 'अजमेर'तक..
'सोमनाथ'से 'काशीविश्वनाथ'तक...!

'रामजन्मभूमी' आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले... ''इसमें 'अर्पण' भी था और 'तर्पण' ... 'संघर्ष' भी था, 'संकल्प' भी था.." हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.

पंतप्रधान पदाचा 'गरिमा' व 'महिमा'  सांभाळणारं हे भाषण होतं. उगाच बाष्कळ व बालिश कोट्या यात नव्हत्या. 'अडखळणं.. अं..आ' वगैरे सुमार गोष्टी तर दुरान्वयानंही नव्हत्या.  विरोधकांना हिणवणारा सूर नव्हता. हातात कागदाचा कपटाही न धरता वक्तृत्वाचा धबधबा वाहत होता. केवळ शाब्दिक फुलोरा नव्हता... आशयसंपन्नता देखील होती. रामजन्मभूमी आंदोलन, रामायणाची सर्वव्यापकता, श्रीरामाचा संदेश असे मोजकेच मुद्दे यात होते.

हेच भाषण एखाद्या साहित्यिकांनं किंवा श्रीराम चरित्राचा वर्षानुवर्षं अभ्यास करणा-या संतानं दिलं असतं तर आश्चर्य वाटलं नसतं. पण असंख्य व्यवधानं सांभाळून, सदैव कार्यमग्न राहणाऱ्या एका राजकीय नेत्यांनं इतकं अस्खलित भाषण करणं ही गोष्ट खरोखरीच अचंबित करणारी आहे.

एकंदरीत या ऐतिहासिक प्रसंगाला साजेसं असं हे 'ऐतिहासिक' वक्तव्य होतं. देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीमागे असलेल्या 'व्यासंगाचा व साधनेचा' प्रत्यय आज आला.


- धनंजय कुरणे

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2