All News

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे – मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे – मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे, दि. २५ सप्टेंबर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्‍याचे आवाहन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पुणे महसूल विभागातील पाच जिल्‍ह्यांशी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, सातारा जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे, कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्‍यमंत्री सतेज पाटील यांच्‍यासह पालक सचिव तसेच जिल्‍हाधिकारी सहभागी झाले होते.

मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रथम जिल्‍ह्यांचा आढावा घेतला. श्री. ठाकरे म्‍हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठी आपल्‍याला एका मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍यामध्‍ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. कोरोनावरील लस उपलब्‍ध होईल तेव्‍हा होईल, तथापि, आज आपण उपचार पद्धती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्‍क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्‍ट अंतर पाळणे यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. समाजामध्‍ये दोन प्रकारचे लोक दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे की जे मास्‍क वापरत नाहीत. सोशल-फिजिकल  डिस्टन्स पाळत नाहीत. यातील पॉझिटिव्‍ह लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याचा धोका असतो. त्‍यांच्‍या माध्‍यमातून होणारा संसर्ग कोणासाठी तरी घातक ठरु शकतो, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

गणेशोत्‍सव आपण सर्वांनी साधेपणाने साजरा केला. तथापि, या काळात बाजारात जी गर्दी झाली त्‍यामुळे कोरोनाचा प्रसार झाला का, हेही पाहिले पाहिजे, आगामी नवरात्र महोत्‍सव साधेपणाने साजरा करावा. रेमडेसिव्‍हीर तसेच इतर औषधांच्‍या वापराबाबत डॉक्‍टरांनाच ठरवू द्या. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक उपचाराबाबत आग्रही असतात. आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होऊ शकतात, असेही श्री. ठाकरे म्‍हणाले.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार म्हणाले, यापुढील काळात कोरोनामुळे बरे झालेल्‍या रुग्णांना काही त्रास होत नाही ना, याची माहिती घेऊन पोस्‍ट कोविड सेंटर सुरु करावे लागण्‍याची शक्‍यता आहे. काहींना कोरोनाची लक्षणे नसली तरी त्रास होत आहे. त्‍यामुळे मोहिमेच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात पोस्‍ट कोविड सेंटरबाबत निर्णय घेता येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची यशस्‍वी अंमलबजावणी होत असल्‍याचे सांगितले. सर्व तालुक्‍यांना भेटी देण्‍यात आल्‍या असून पहिल्‍या टप्‍प्यात आजपर्यंत 182 गावांचे आणि 13 नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी 2300 पेक्षा जास्‍त पथके नेमण्‍यात आली तसेच त्‍यांचे प्रशिक्षणही घेण्‍यात आले. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्‍या उपयुक्‍त सूचनांमुळे ही मोहीम यशस्‍वी होत आहे. पुणे जिल्‍ह्यात उद्योग, कारखाने मोठ्या संख्‍येने आहेत. त्‍यामुळे ‘माझी फॅक्‍टरी, माझी जबाबदारी’, ‘माझी हौसिंग सोसायटी, माझी  जबाबदारी’ ‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ अशा पद्धतीने लोकसहभाग घेण्‍यात येत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री यांचे सल्‍लागार डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी सहव्‍याधी रुग्‍णांची तपासणी करण्‍यावर भर देण्‍याची गरज प्रतिपादन केली. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्‍या संदेशाबाबत कारवाई केली जावी, असेही सांगितले.

या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी  उपस्थित होते.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam