All News

धनंजय मुंडे यांच्याविरोधात दुस-या पत्नीची तक्रार

धनंजय मुंडे यांच्याविरोधात  दुस-या पत्नीची तक्रार

  • दोन मुलांना डांबून ठेवल्याचा आरोप; उपोषणाचा इशारा

मुंबई, दि. ३ फेब्रुवारी   : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्‍या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत काही थांबायला तयार नाहीत. त्यांच्या दुस-या  पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलिस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात 14 वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 तारखेपासून उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. 


करुणा यांनी पोलिस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपवून ठेवले आहेत. मला त्यांना भेटू दिले जात नाही. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. त्यात 14 वर्षांच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्‍लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही, तर 20 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


चित्रकूट बंगला, मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्या आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात, असे मुंडे यांनी म्हटले होते. 


 माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले होते. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत; मात्र 2019 पासून करूणा त्यांची बहीण रेणू यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मादेखील सहभागी होता, असा आरोप धनंजय यांनी केला होता.


मुंडे रावणापेक्षाही जास्त अत्याचारी!

करुणा शर्मा यांनी फेसबुक पोष्ट टाकली आहे. त्यात आज माझा वाढदिवस आहे; परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना तीन महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाही. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता, असा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 IBPS MahaExam