All News

निर्विवाद निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची : राधाकृष्ण गमे

निर्विवाद निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची : राधाकृष्ण गमे

नाशिक, दि.२६ जानेवारी : राज्य पातळीवर एकाच वेळी निवडणूकांसाठी मतदान प्रक्रीया राबविण्यात येत असते. एकाच वेळी सर्वत्र राबविण्यात येणारी मतदान व निवडणूक प्रक्रीया निर्विवाद व अचूकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल, तहसिलदार प्रशांत पाटील, रचना पवार आदी उपस्थित होते.


विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, मतदानाची प्रक्रीया एक दिवसाची असली तरी ती व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रीयेत सुसुत्रता आणण्यासाठी मतदार यादी अद्यावत करणे, नव मतदारांची नोंद घेणे, दुबार व मयत मतदारांची नावे वगळणे तसेच याअनुषंगिक कामे सातत्याने सुरू असतात. ही कामे निवडणूक प्रशासनाशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अतिशय उत्कृष्टपणे करीत असतात. निवडणूकीची प्रक्रीयेत सुसुत्रता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात 2019 मध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रीया राबविण्यात आली, यावेळी निवडणूकी संदर्भात करण्यात आलेली जनजागृती यामुळे देखील जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान झाले असल्याचा आर्वजून उल्लेख विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी यावेळी केला. 


राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सहभागातून जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ अशी लोकशाही निर्माण झाली आहे. इतर देशांच्या निवडणूक प्रक्रीयेच्या तुलनेत आपल्याकडे खूप कमी कालावधीत व नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रीया राबविण्यात येत असते, ही अतिशय अद्भूत गोष्ट आहे. मतदानापासून कोणही वंचित राहू नये याकरिता इलेक्टरर्स फोटो आयडेंटी कार्ड (EPIC) मिळण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत तीन संकेतस्थळांवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच निवडणूक प्रक्रीया राबवत असतांना लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी देखील आपण कटबद्ध आहोत, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले.


सर्व सामान्य नागरीकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये जावे लागते, नागरिकांचा हा त्रास वाचविण्याच्या व जिल्हा प्रशासनाचे कामकाज डिजिटाईज करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनामार्फत ‘नाशिक मित्र’ या पोर्टलचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमध्ये चांगले काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार दर महिन्याला होणाऱ्या राष्ट्र पुरूषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी करण्याचा नवीन उपक्रम देखील सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी दिली आहे.


आजच्या राष्ट्ररीय मतदार दिनापासून मतदारांना मतदान ओळखपत्रासाठी e-EPIC ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेच्या माध्यमातून प्रत्येक नवमतदाराला आपल्या मोबाईलवर अथवा संगणकावर पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. तसेच 25 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीमध्ये युनिक मोबाईल क्रमांक असलेल्या नवमतदारांना एसएमएस द्वारे लिंक पाठविण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी नंतर युनिक मोबईल क्रमांक असलेल्या सर्व मतदारांसाठी https://nvsp.in/, https://voterportal.eci.gov.in/, या संकेतस्थळांद्वारे व Voter Helpline mobile app (Android/iOS) मोबाईलप्रणाली द्वारे e-EPIC डाऊनलोड करता येईल. तसेच ज्या मतदारांकडे युनिक मोबईल क्रमांक नाही त्यांना https://Kyc.eci.gov.in यासंकेतस्थळावरून मोगाई क्रमांक टाकून e-EPIC डाऊनलोड करता येईल, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती थविल यांनी दिली आहे.


या कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली आणि कार्यक्रमा दरम्यान 18 ते 20 वयोगटातील दहा नव मतदार व दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळाखपत्र देण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रीया वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचाही यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS test2