All News

शिवसेनेबरोबर कायम राहायचे असल्याने जुळवून घ्या : अजित पवार

शिवसेनेबरोबर कायम राहायचे असल्याने जुळवून घ्या : अजित पवार

  • अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवल खलबते

 मुंबई, दि. २३ डिसेंबर :  आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. 


मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खलबते झाल्याची माहिती आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पवार म्हणाले, की महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहेत; पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या. लवकरच महामंडळांचे वाटप करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यापुढील सर्व निवडणुका एकत्रितरित्या लढण्याचे संकेत आधीच दिले होते. 


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. पराभूत उमदेवारांना मिळालेली मते, त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल, याचीही चर्चा या बैठकीत झाली. त्यानंतर त्यांना जबाबदा-यांचे वाटप करण्यात येणार आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अनेकांना आपण पक्षात अडगळीत फेकल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बरेच पदाधिकारी नाराज आहेत. त्यातच भाजपने सत्ताधारी पक्षातील मिळेल त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात गळती लागू नये म्हणून या बैठकीच्या माध्यमातून पराभूतांना महत्त्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2 MahaExam