All News

शिर्डी, तिरुपती, वैष्णवदेवीचे एक जानेवारीचे बुकिंग संपले

शिर्डी, तिरुपती, वैष्णवदेवीचे एक जानेवारीचे बुकिंग संपले

मुंबई, दि. २८ डिसेंबर :  नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला देशातील तीन मोठी मंदिरे  असलेल्या तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा व वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी उपलब्ध सर्व तिकिटे संपली आहेत. कोरोनामुळे तीनही मंदिरांत दर्शनासाठी आगाऊ बुकिंग आवश्यक आहे. त्यामुळे तिन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाने एक जानेवारीला बुकिंग नसलेल्या भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.  


नवीन वर्षानिमित्त या मंदिरांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के कमी भाविक येण्याची ही पहिलीच वेळ असेल. दुसरीकडे अयोध्येत भाविकांची संख्या ठरवण्यात आलेली नाही. तेथे कोरोनामुळे रामलल्लांच्या दर्शनासाठी रोज सुमारे ४०० भाविक येत आहेत. जम्मूतील कटरामध्ये वैष्णोदेवी मंदिरात १५ हजार भाविकांनी तिकिटे बुक केली आहेत. भाविकांना ऑनलाइन तिकीट काढण्याबरोबरच कटरात आल्यानंतर मागील ४८ तासांत केलेल्या कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखवावा लागेल. दर्शनासाठी पायी जाण्याबरोबरच रोप वे आणि हेलिकॉप्टर सेवेसाठीही आगाऊ बुकिंग करावी लागेल. कटरामध्ये विश्रामगृह आणि हॉटेल्समध्ये बुकिंग दरात ४० टक्के आणि उपाहारगृहात २० टक्के सूट दिली जात आहे.


साईबाबा मंदिरात १२ हजार जणांनाच दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांतील सर्व ऑनलाइन तिकिटे बुक झाली आहेत. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सांगितले, की रोजच्या सहा हजार तिकिटांची ऑनलाइन बुकिंग करण्यात आली आहे, तर सहा हजार मंदिराबाहेरील काउंटरवरून दिली जात आहेत. ऑनलाइन बुकिंगची किंमत २०० रुपये आहे. मंदिर काउंटरवर तिकीट नि:शुल्क आहे. बाहेरून येणाऱ्यांनी ऑनलाइन तिकीट बुक करूनच शिर्डीत यावे.  


तिरुपतीत स्थानिक भाविकांसाठी १० हजार आणि बाहेरच्या भाविकांसाठी ३० हजार तिकिटे देण्यात आली आहेत. या वेळी विशेष म्हणजे २५ डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत मंदिराचे विशेष वैकुंठद्वार (उत्तर द्वार) उघडण्यात आले आहे. दरवर्षी ते केवळ वैकुंठ एकादशी आणि द्वादशी हे दोन दिवस उघडते. कोरोनामुळे या वेळी दर्शन तिकीट दाखवल्यानंतरच अलिपिरीहून पुढे जाण्याची परवानगी असेल. एक जानेवारीला व्हीआयपी दर्शनाची सोय नसेल.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2