नाशिक, दि. ३० मे : कोरोनाचा संसर्ग,हादरलेले जनमानस,वैद्यकीय उपचार,या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ञ डॉ. शिरीष राजे यांनी कठोर परिस्थितीत स्वमनाची शक्ती जागृत करण्याचे आवाहन समाजमनाला केले. वसंत व्याख्यानमालेत एकोणतीसावे पुष्प त्यांनी 'स्वमनाची शक्ती' या विषयावर गुंफले. स्व. अर्जुनसिंग बग्गा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कोरोनावर कुठलाही ठोस औषधोपचार नसतांनाही त्यावर रुग्णालयात उपचार केले जाताहेत,९५ टक्के रुग्ण बरे होत असताना काहींना केवळ भीतीपोटी जीव गमवावा लागला, फक्त मानसिक भीतीतून हे रुग्ण दगावले असून, मानसिकदृष्ट्या त्यांना यातून बाहेर काढण्याची गरज डॉ.राजे यांनी व्यक्त केली. कोरोना येण्यापूर्वी चीनमधील अनेक भयंकर व्हीडिओ व्हायरल झाले,प्रसार माध्यमांनीही अतिरंजित प्रसिद्धी दिली.तेव्हा भारतात कोरोना नव्हताही, पण या आजाराचे नकारात्मक चित्र नजरेसमोर आणल्याने जनमानस भीतीच्या सावटाखाली आले.
आणि त्याचे परिणाम सर्वत्र दिसत आहे, प्लेग,स्वाईन फ्लूसारखाच हा आजार असून मन स्थिर ठेवण्याचे आवाहन डॉ. राजे यांनी केले. महाभारतातील युद्धात आप्तस्वकीयांना पाहून अर्जुनाने शस्र खाली ठेवले,तेव्हा भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने अर्जुनाचे समुपदेशन केले,अर्जुनासारखा योद्धा प्रत्यक्ष लढाईपुर्वीच हरला होता,पण भगवंताने अर्जुनाच्या मानसिकतेला हात घातला,अर्थात अर्जुनाची स्वमनाची शक्ती जागृत करण्याचे काम केले, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून दुरितांचे तिमिर जावो'असे सांगून सर्वसामान्यांच्या मनातील अंधःकार दूर व्हावा असा उपदेश केला,म्हणूनच अचेतन मनातील गोष्टी नकारात्मक भावना स्वीकारतात,तेव्हा स्वमनाची शक्ती जागृत करण्याची गरज डॉ. शिरीष राजे यांनी व्यक्त केली.
कष्ट,इच्छाशक्ती, एकांतवास, सकारात्मक विचार, तंदुरुस्ती यामुळे मन,विचार सकारात्मक होतात,असेही डॉ. राजेंनी सांगितले. कोरोना आजारांवर कुठलेही औषध नाही,डॉक्टर रुग्णांना अँटिबायोटिक औषधे देऊन रुग्णाची मानसिकता तयार करतात,रुग्णास कोरोनामुक्त करणे हीच या औषधांची शक्ती आहे,कोरोना हा व्हायरल इन्फेक्शन असून रेमडीसीविरची मात्राही त्यास लागू होत नाही असे स्पष्ट करून डॉ.राजे यांनी रुग्णाची मानसिकता तयार करण्याचे वैद्यकीय प्रयत्न असल्याचे विशद केले. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.