प्लांटला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे.
अच्युतापुरम, दि. २२ : आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. अनकापल्लीच्या जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) असलेल्या एसिएन्टिया अॅडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आग लागली. मृतांचा आकडा १५ वर पोहोचला असून तो वाढण्याची शक्यता आहे. तर जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. दीपिका यांनी रॉयटर्सला दिली. सुरुवातीच्या अहवालात रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु कृष्णन यांनी ही आग रिअॅक्टरच्या स्फोटामुळे लागली नसल्याचे स्पष्ट केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी अनाकापल्ली आणि अच्युतापुरम येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.