केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून आम आदमी पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
दिल्ली, दि. १६ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जागा कोण घेणार याविषयी चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून आम आदमी पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची नावं चर्चेत आहेत.आम आदमी पक्ष हा तुलनेनं नवा असला तरी या पक्षात अनेक उच्चशिक्षित व सामाजिक कार्याचा अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळं साहजिकच केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. यात केजरीवाल व मनीष सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत दिल्ली सरकारचा कारभार पाहणाऱ्या मंत्री आतिशी यांच्यासह सौरभ भारद्वाज, कैलास गहलोत, गोपाल राय आणि इम्रान हुसेन या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आतिशी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्यासाठी केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली होती. मात्र, नायब राज्यपालांनी त्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, आतिशी यांच्यावर केजरीवाल यांचा विश्वास असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.