रानडे यांनी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
पुणे, दि. १५ : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची शनिवारी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संस्थेच्या म्हणण्यानुसार रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांचे उल्लंघन करून झाली. रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. संस्थेने रानडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की समितीचे मत आहे की त्यांची निवड ही यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित निकषांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना कुलगुरू या पदावरून हटवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रानडे यांनी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.