IMG-LOGO
नाशिक शहर

महाराष्ट्रात एक हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारायचीय : गाडगीळ

Sunday, May 12
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यानात ते 'महाराष्ट्रीयन माणसे- स्थानिक छटा असलेला जागतिक खजिना' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. १२  :  भविष्याचा विचार करता आपल्याला एक हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारायची आहे. त्यासाठी मराठी माणसं जगभर अत्यंत सचोटीने काम करत आहेत. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही. असे प्रतिपादन लंडन येथील उद्योजक रविंद्र गाडगीळ यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यानात ते 'महाराष्ट्रीयन माणसे- स्थानिक छटा असलेला जागतिक खजिना' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. निर्मलाताई दातार यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. विश्वास मदाने यांनी स्वागत केले. श्री. गाडगीळ  म्हणाले की, मराठी माणसाला उच्च स्थान आणि त्यांच्या धडपडिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आमची संस्था जगभर कार्यरत आहे. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक संतांची आणि समाज सुधारकांची परंपरा आणि  प्रेरणा महाराष्ट्राला लाभली आहे. याशिवाय भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी सर्वांगीण समृद्धी महाराष्ट्राला लाभलेली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत सामाजिक बाबी, स्त्री शिक्षण, उच्च शिक्षण, देशसेवा, आदी क्षेत्रांतही महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रीयन लोक अत्यंत सचोटीने व्यवसाय करतात. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला महाराष्ट्रीयन माणसं चांगल्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. संस्कृती संवर्धनासाठी ते सर्वत्र कार्यरत आहेत. प्रसिद्धी माध्यमांपासून मराठी माणसं नेहमी दूर असतात, अशी निरीक्षणेही त्यांनी यावेळी नोंदविली. त्याचवेळी आपल्यातील न्यूनगंड पुसून काढणे, उद्योजकता वाढविणे आणि काही अत्यावश्यक बदल घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आधुनिक जैविक संशोधन, ज्येष्ठ नागरिकांना सौयी सुविधा यासारख्या क्षेत्रात जगभरात खुप संधी आहेत. त्यासाठी लागणारी क्षमताही आपल्याकडे आहे. टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया, कचऱ्यातून नवनिर्मिती, पर्यटन, संग्रहालये, बदलत्या जीवनशैलीनुसार आरोग्यसेवा, विद्युत वाहनाला लागणाऱ्या सुविधा यासारख्या क्षेत्रांत काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आपली सर्वांगीण ताकद जाणून घेतली पाहिजे. प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. शासनाकडून दखल घेतली जाणे आणि मदत मिळणे सहज शक्य आहे; मात्र तिथपर्यंत आपण पोहचलो पाहिजे. ओमपेक व गर्जे महाराष्ट्र ग्लोबल या संस्थांची माहिती देत त्याद्वारे जगभर मदत ऊपलब्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संतोष फासाटे व अफलातुन ग्रुप प्रस्तुत सुरसम्राज्ञानी हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये अपर्णा देशपांडे, डॉ. विशाखा जगताप, समृद्धी गांगुर्डे, मिता डोगरा, किरण गोसावी यांनी लतादीदीची सदाबहार गीते सादर केली. अमोल पाळेकर यांनी संगीत संयोजन केले. तर संतोष फासाटे यांनी निवेदन केले.

Share: