श्री काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला.
नाशिक, दि. २३ : प्रेम प्रकरणात झालेल्या मारहाणीमुळे संतप्त संशयिताने अस्तित्वात नसलेल्या संघटनेच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पत्रकांचे वाटप केल्याने शनिवारी सकाळी पंचवटीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरीत तपास करुन संशयिताला अटक केली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून श्री काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला. नाशिकमध्ये एका बंद पडलेल्या संघटनेच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटण्यात आली. त्यामुळे शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने समाजबांधव पोलिस ठाण्यात जमा झाले. संशयितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको केला. काहींनी परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. काही व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद केली. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव म्हणाले. पोलिसांनी प्रकरणाचा त्वरेने तपास करुन अमोल सोनवणे या संशयितास ताब्यात घेतले. अमोलचे एकाच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. हा प्रकार संंबधितांच्या कुटूंबियांच्या लक्षात आल्यावर अमोल याला समज देण्यात आली. त्याच्याविरूध्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याचा वचपा काढण्यासाठी संबंधित व्यक्तीस त्रास व्हावा, या उद्देशाने संबंधितांच्या नावे आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पत्रकांचे वाटप केल्याची कबुली सोनवणे याने दिली असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले.