निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू होते.
हैदराबाद, दि. १२ : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर अवघ्या सात महिन्यांपूर्वी निर्दोष सुटलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते एन. साईबाबा यांचे शनिवारी हैदराबादेत सरकारी रुग्णालयात निधन झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. साईबाबा यांनी रात्री नऊच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. पित्ताशयाचा संसर्ग आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. यावर्षी मार्च मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील (निम्स) निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू होते. जी एन साईबाबा यांच्या पित्ताशयावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते.