दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकारने खूश केले आहे.
नवी दिल्ली, दि. २३ : मोदी सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेशची विशेष श्रेणी दर्जाची मागणी मान्य करणे शक्य नसल्याने अर्थसंकल्पात दोन्ही राज्यांना झुकते माप देण्यात आले आहे. बिहारमधील विविध प्रकल्पांकरिता ५९ हजार कोटी, तर आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटींची (एकूण ७४ हजार कोटी) भरीव तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. गेल्या १० वर्षांत एकदाही विशिष्ट राज्यासाठी विशेष तरतूद केली गेली नव्हती. मात्र या वेळी प्रथमच केंद्रीय बिहार आणि आंध्र प्रदेशचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने मोदी सरकारचे भवितव्य नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून आहे. यातूनच या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकारने खूश केले आहे.