वसंत व्याख्यानमालेत स्व. राधाकिसन चांडक स्मृती व्याख्यानात ते 'समान नागरी कायदा : वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा' या विषयावर बोलत होते.
नाशिक, दि. १७ : समान नागरी कायदा मुळातच 95 टक्के आधीपासूनच लागु आहे. केवळ गैरसमजांतून याबाबत संभ्रम पसरविला जात आहे आणि त्याला राजकीय दृष्टिकोन कारणीभूत आहे. असे प्रतिपादन पुणे येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. राधाकिसन चांडक स्मृती व्याख्यानात ते 'समान नागरी कायदा : वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. राधाकिसन चांडक यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. निवृत्त मुख्याध्यापक व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी व्ही. टी. जाधव यांनी श्री. तांबोळी यांचे स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. तांबोळी म्हणाले की, समान नागरी कायद्याचे वास्तव, अपेक्षा आणि सुधारणेबाबत त्यांनी तीन भागांत मांडणी केली. हा विषय गैरसमज करायला सोपा, तर समजून घ्यायला अवघड असा विषय आहे. मुळात हा कायदा नसुन संहिता आहे. चुकीच्या पद्धतीने मांडणी आणि सादरीकरण झाल्यामुळे याबाबत सामान्य लोकांत मोठा गैरसमज पसरला आहे. मुळातच हा कायदा 95 टक्के अस्तीवात असल्याचे सांगताना त्यांनी विविध जाती-धर्मांच्या विवाह, घटस्फोट, पोटगी आदींसह विविध तरतुदी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. या सर्वांत महिलांना दुय्यम वागणुक दिली गेली आहे आणि आपण ज्या दृष्टीने विकास साधत आहोत, त्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे. अशा अवघड विषयांवर सरकारने लोकशिक्षण केले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. समान नागरी कायदा त्यामुळेच महत्वाचा ठरतो. हा कायदा राजकीय विचारांनी प्रेरित आहे काय, याचाही विचार झाला पाहिजे. हा मुद्दा संविधान स्वीकारतानाच चर्चिला गेला. मात्र त्यावेळी गोळवलकर गुरुजी आणि मुस्लिम नेत्यांसह सर्वच जाती-धर्मांच्या नेत्यानी त्यास विरोध केला होता. कारण ते सेक्युलर आणि लोकशाहीवादी होते. त्यामुळे लौकमाणस निर्माण करण्यासाठी हा कायदा तेव्हापासून केवळ चर्चेतच राहिल्याचे सांगुन त्यांनी यातील कलम 3 व 4 बाबत माहिती दिली. याची मुळ प्रक्रीया योग्य पद्धतीने राबविली गेली नाही. त्या ऐवजी मुस्लिम लॉ आणि तत्सम विषयांवर जास्त लक्ष दिले गेले. त्यातही राजकीय हेतूने निर्णय घेतले गेले. तलाकसारखे विषयही न्यायालयीन प्रक्रीयेतुन गेले असते, तर 70 टक्के समस्या कधीच सुटल्या असत्या. प्रत्यक्षात आजही अनेक हिंदु संघटनादेखील या कायद्याच्या विरोधात आहेत. त्याचीही वेगवेगळी कारणं आहेत. त्यातूनच मुस्लिमांनाही विरोध होतोय, असेही ते म्हणाले. म्हणजेच हा धार्मीकतेचा नव्हे तर दांभिकतेचा विषय आहे. खरे तर ही दांभिकता दोन्ही धर्मात दिसून येते. तुम्ही शरीयतला प्राधान्य देणार की संसदेला ? हा प्रश्न महत्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांच्या वतीने भक्ती महोत्सवचा दुसरा भाग सादर करण्यात आला. यामध्ये ज्ञानेश वर्मा व सहकाऱ्यांनी 'राम श्याम गुणगान' हा कार्यक्रम सादर केला. सुबोध मिश्र यांनी निवेदन केले.