आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिलेला शब्द फिरवला गेला.
मुंबई, दि. २२ : ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपला रामराम ठोकला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने त्यांनी पक्ष सोडला असल्याचं म्हटलंय. आज नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं, दीर्घ आणि प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय निर्णय होत नाही. हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत, हे मार्गी लागण्याकरता त्यावेळी निर्णय घेतला गेला. परंतु, आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे काही अंशी माझी कोंडी झाली. माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे.” असेही त्यांनी नमूद केले.