कांद्यावर आमचे आयुष्य अवलंबून आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा दरावरुन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.
नाशिक, दि. २० : जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा हाच विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. कांदा निर्यातीसंदर्भात केंद्राच्या धरसोड भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा रोष कायम असून चांदवड तालुक्यातील वडगाव येथे बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केले. कांद्यावर आमचे आयुष्य अवलंबून आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा दरावरुन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. त्यांनी आमचे हाल केले, अशी भूमिका मांडत त्यांनी मतदान केंद्र गाठले. पोलिसांनी त्यांना मतदान केंद्राबाहेर थांबवित कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. परंतु, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कांद्याच्या माळा गळ्यात ठेवूनच त्यांनी मतदान केले. धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बागलाण विधानसभा मतदार संघातही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी आमदार तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली.