IMG-LOGO
राष्ट्रीय

रामोजी समुहाचे चेअरमन रामोजी राव यांचे निधन

Saturday, Jun 08
IMG

रामोजी राव यांना उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 5 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हैदराबाद, दि.९ : रामोजी समुहाचे चेअरमन रामोजी राव यांनी वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (8 जून) पहाटेच्या 3.45 वाजता त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात. वर्ष 2016मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, रामोजी राव यांना उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 5 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेर श्वास घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते जी. किशन रेड्डी यांनी शोक व्यक्त करत म्हटलेय की, "श्री रामोजी राव गारू यांच्या निधनाने दु:ख झाले. तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे." रामोजी राव हे भारतीय चित्रपट निर्माते आणि उषाकिरण मुव्हीज प्रोडक्शन कंपनीचे प्रमुख होते. 'चेरुकुरी रामोजी राव' या नावानेही ते प्रसिद्ध होते. जगातील सर्वात मोठे फिल्म प्रोडक्शन रामोजी फिल्म सिटीचे ते मालक होते. सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली  श्री रामोजी राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे.भारतीय माध्यमांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारे ते दूरदर्शी व्यक्तिमत्व होते.त्यांच्या सेवांनी चित्रपट आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अमिट छाप सोडली. आपल्या अथक परिश्रमांद्वारे त्यांनी माध्यम आणि मनोरंजनाच्या जगात उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. रामोजी राव हे भारताच्या विकासाबाबत खूप उत्साही होते.त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या अफाट ज्ञानाचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या.या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या मनापासून संवेदना.ओम शांती.अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

Share: