IMG-LOGO
नाशिक शहर

सकारात्मक विचारांनी केलेल्या संकल्पातूनच मिळते अपेक्षित यश : डॉ. मसंद

Wednesday, May 22
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यानात ते 'संकल्पांची शक्ती' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २२ : मेंदुपासून मिळणारे संदेश आपल्या हालचाली नियंत्रित करत असतात. त्यामुळे आपल्या मेंदूत नेहमी सकारात्मक विचार प्रसवले पाहिजे. त्यातुनच आपण चांगले संकल्प घेऊन मोठे काम करू शकतात. असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माऊंट अबु येथील ब्रह्मकुमार डॉ. प्रेम मसंद यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यानात ते 'संकल्पांची शक्ती' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. डॉ. सुभाष सुराणा यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. अजित सुराणा, वासंतीदीदी, पुनमदीदी, ग्लास्को कंपनीचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी राजेंद्र देशपांडे, नामको बँकेचे संचालक सुभाष नहार व उद्योजक सुनील चोपडा व्यासपीठावर उपस्थित होते. राजनभाई राजधर यांनी स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरुवातीला ओमभाई या साधकांने एक आध्यात्मिक गीत सादर केले. डॉ. मसंद म्हणाले की, जीवनाची सुरुवातच विचार आणि संकल्प यापासूनच होते. आपली चेतना ही संपूर्ण आयुष्याला नियंत्रित करत असते. जीवनात जे मोठे झाले ते केवळ संकल्प घेऊनच झाले. देशाचे स्वातंत्र्य असो, वसंत व्याख्यानमाला असो की अन्य कोणतेही मोठे काम घ्या. संकल्पाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आपला मेंदु हा सर्वांत मोठी शक्ती आहे. आज समाजात विविध आजार वाढत असताना त्यात मोठ्या प्रमाणात डिप्रेशन आढळते. आपले इमोशन जेव्हा नकारात्मक होतात तेव्हा आपली सहनशक्ती कमकुवत होत जाते. विचारांच्या गोंधळात नकारात्मकता वाढत जाते. त्यातून डिप्रेशन पुढे येते. त्यामुळे आपल्या पुढील पिढीला कृतिशील बनवा. आजच्या जगात निर्णयक्षमतेलाही अनन्य साधारण महत्व असते. याबाबत त्यांनी जगभर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे उदाहरण दिले. त्यासाठी आपली विवेकबुद्धी सादैव जागृत असावी, असेही ते म्हणाले. मेंदुमधुन निघणारे टॉक्सिन, ट्रोमा आणि संकल्प या तीन बाबी आपल्या एकूणच जीवनाला नियंत्रित करत असतात. त्यामुळे या तीन बाबी नेहमी आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजे. हे केवळ सकारात्मक विचारांतूनच शक्य होते. चांगल्या गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजे, तसेच वाईट गोष्टी डिलीट करता आल्या पाहिजे. यासाठी त्यांनी काही उदाहरणातून सकारात्मक विचारांसाठी काही संदेशही दिले. ते म्हणाले की, आपल्या कामावर प्रेम करा, नकारात्मक प्रसंगात नाही म्हणायला शिका, निर्णयक्षमता वाढवा, अपयशाला यशाची पहिली पायरी माना, आपले लक्ष्य निश्चित करा, देवावर पुर्ण विश्वास ठेवा. याच आधारावर आपल्या मेंदूतून निघणारे विचारच पुन्हा आपल्याकडे येतात आणि त्यानुसारच आपल्या कर्माचे फळ मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी ऐपल कंपनी, अब्दुल कलाम आदींशी संबंधीत उदाहरणांतून त्यांनी संकल्पांची शक्ती या विषयी मार्गदर्शन केले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरगम म्युझिक अकँडमी प्रस्तुत 'किशोर कुमार ते कुमार सानु' हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये नंदकुमार देशपांडे यांच्यासह मनोज कराळे, प्रकाश रत्नाकर, अजय पाटील, प्रमोद दीक्षित, सानिका जैन, मयुरी मुर्डेश्वर, भाग्यश्री गायधनी यांनी विविध गिते सादर केली.

Share: