या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवळाली, दि. ११ : येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तोफखाना सरावा दरम्यान, मोठा स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये 'आयएफजी इंडियन फिल्ड गन'ने फायरिंग सुरु असतांना हा मोठा स्फोट झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. गोहिल विश्वराज सिंग (वय २०), सैफत शित (वय २१) अशी शहीद झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचे आर्टिलरी सेंटरमध्ये बोफोर्सपासून विविध तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी गुरुवारी अग्निवीरांना दुपारी 'आयएफजी इंडियन फिल्ड गन'ने प्रशिक्षण दिले जात होते. या वेळी फायरिंग करत असताना अचानक एका बॉम्बगोळ्याचा स्फोट झाला. स्फोटांमुळे बॉम्ब गोळ्याचे तुकडे हे अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना लष्कराच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.