IMG-LOGO
नाशिक शहर

भारताच्या प्रगतीचा पाया गांधी- नेहरूंनी रचलेला : आमदार तांबे

Thursday, May 16
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. वसंतराव नेवासकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

नाशिक, दि. १६   : भारताच्या प्रगतीचा पाया कॉंग्रेसने मजबूत केला आहे. कारण एकाच दिवशी स्वतंत्र झालेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची तुलनाच होऊ शकत नाही. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यानेच आपण हे यश मिळवू शकलो. असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. वसंतराव नेवासकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. अरूण नेवासकर व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आमदार तांबे म्हणाले की, खरे तर देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे फक्त शंभर वर्षांचा प्रगतीचा आढावा म्हणजे अगदीच छोटा कालखंड असला तरी या शंभर वर्षांच्या काळात आपण केलेली प्रगती ही आशादायक आहे. तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्याला देश महासत्ता होईल असे स्वप्न दाखवले. त्या माध्यमातून आपण ठरवलेले एक लक्ष्य आता आपण किमान 2047 पर्यंत महासत्ता होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण केलेल्या प्रगतीत जितका वाटा स्वातंत्र्य सैनिकांचा आहे, तितकाच स्वतंत्र भारत घडविणाऱ्या नेत्यांचाही आहे. पंडित नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांच्या धोरणातून आजचा भारत उभा राहिला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले असतानाही आज या दोन्ही देशाच्या प्रगतीची तुलनाच होऊ शकत नाही. घटनेने आपल्याला सारेकाही सहज उपलब्ध करून दिले. त्यामुळे आपल्याला त्याचे महत्व आपल्याला कळत नाही. असे सांगत श्री. तांबे यांनी भारत पाक युध्द, नियोजन आयोग (आताचा नीती आयोग), पहिली पंचवार्षिक योजना, फाळणी, चीनसोबत युद्ध, कारगिलचे युद्ध, पाण्याचे प्रयत्न, बँकांचे राष्ट्रीयकरण, धवल क्रांती, हरित क्रांती, अणू चाचणी, इस्रोची स्थापना, आणीबाणीचा काळ  आदी आव्हानं पेलत भारताच्या यशाचे कौतुक केले पाहिजे असेही ते म्हणाले. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वानंतर राजीव गांधी यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. हे निर्णयदेखील प्रगतीसाठी खुपच उपयोगी ठरले. त्यानंतरही पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वानेही या प्रगतीत मोलाची भर घातली. हा सर्व आढावा मांडतानाच त्यांनी विरोधकांच्या कामाचेही कौतुक केले. या दरम्यान अनेक नकारात्मक घटनाही घडल्या. सरकार बदलत गेले. विकासही घडत होता. अटल बिहारी वाजपेयी यांनीही चांगले काम केले. मात्र त्यांची काही धोरणं लोकाना आवडली नाहीत. त्यातून सत्तांतर घडले. आधीकाराची लढाई, अणू करार, अमेरिकेशी असलेले संबंध, अलिप्तवादी धोरण, परराष्ट्र धोरणं ही या यशाच्या वाटचालीतील पाऊल खुणा आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर आपल्याला नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यांनीही अनेक निर्णय घेतले. त्यातील काही चांगले, तर काही न आवडणारेही होते. कोरोनाचे संकट त्यांनी संयमाने आणि धैर्याने हाताळले. आता आपण विकसित भारताचे स्वप्न बघत आहोत. पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीचा टप्पा गाठणे हे एक मोठे आव्हान आहे. या वाटचालीत अनेक देश धडपडत असताना आपला विकासाचा दर दहा टक्के असायला हवा. आज हा दर आणि वेग अत्यंत कमी आहे. हा दर गाठण्यासाठी आपल्याला खुप काम करावे लागणार आहे. त्यामुळे हे स्वप्न म्हणजे दीवास्वप्न ठरेल की काय अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरगम सुगम संगीत अकादमी व सिंफनी कराओके क्लब प्रस्तुत 'चित्रहार' हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये नमिता राजहंस, प्रशांत चंद्रात्रे, विक्रम खैरनार, रणजित राजपूत, हितेंद्र शर्मा, राधा जोशी यांनी सदाबहार गिते सादर केली. तर समीर ओतुरकर यांनी निवेदन केले.

Share: