IMG-LOGO
नाशिक शहर

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Saturday, Aug 24
IMG

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जमा झाले.

नाशिक, दि. २३ : महिला म्हणजे आदिशक्तीच आहेत. त्यांच्यासाठी काही करता आले, हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला. भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन‌ महिलांच्या सुरक्षेप्रतीही संवेदनशील आहे. लाडकी बहीणप्रमाणेच सुरक्षित बहीणसाठीही शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.तपोवन मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या महाशिबिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार  किशोर दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जमा झाले. नाशिक जिल्ह्यातील ११ लाख अर्जांपैकी ८ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित ३ लाख महिलांच्या खात्यात पुढील आठवड्यात पैसे जमा होतील. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही. याउलट लाडकी बहीण योजनेच्या लाभात वेळोवेळी वाढ केली जाईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासनाने कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्यात येत आहे, असे सांगून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे काम कोणीही करू नये. राज्याची पुरोगामी संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Share: