देशाच्या विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.
जळगाव, दि. २५ : महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नारीशक्ती ही विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही. संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, यात राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेवून लघु उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना 30 कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना – शिवराज सिंह चौहानलखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री अजित पवारसंपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे. केळी, कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात 50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.उघड्या जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारावलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.