विनेशनं आपली पहिली-वहिली निवडणूक मोठ्या फरकानं जिंकली आहे.
चंडीगड, दि. ८ : हरयाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काही जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपनं निकालांमध्ये आघाडी घेतली असली तरी काँग्रेसच्या बहुतेक महत्त्वाच्या उमेदवारांनी निराशा केलेली नाही. कुस्तीपटू विनेश फोगाट यापैकीच एक आहे. विनेशनं आपली पहिली-वहिली निवडणूक मोठ्या फरकानं जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्ती घेतलेल्या व भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या फोगाट हिनं विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं तिला जुलाना (Julana) मतदारसंघातून रिंगणात उतरवलं होतं. या मतदारसंघावर सर्वांच्या नजरा होत्या. भारतीय जनता पक्षानं योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती.जुलाना मतदारसंघात सर्व १५ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. विनेश फोगाट हिनं पहिल्या निवडणुकीत ६५०८० मतं मिळवली. तर, तिचे प्रतिस्पर्धी भाजपचे योगेश कुमार बैरागी यांना ५९०६५ मत मिळाली आहेत. फोगाट हिनं ६०१५ मतांनी हा निवडणूक जिंकली आहे