IMG-LOGO
महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यात मुसळधार, पुण्यात अनेक भागामध्ये शिरले पाणी; शाळांना सुटी जाहीर

Thursday, Jul 25
IMG

खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे, दि.२५ :  आज सकाळपासून कोकणासह (Maharashtra Heavy Rain) मुंबई, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात तुफान पाऊस सुरू असून सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन तासांत पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी  अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि घाट क्षेत्रात (Rain Update) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने १५०००  पासून ते ४०००० पर्यंत पाणी वाढवलं जाणार आहे. धरणातून विसर्ग सुरू होताच सिंहगड रोडवरच्या १५ सोसायटीमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं आहे. काही वेळापूर्वी इथलं पाणी कमी झालं होतं, परंतु आता इथे कमरेएवढी पाणी पातळी झाली आहे. या भागामध्ये आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने १६० जणांना इथून सुरक्षित हलवलं आहे. एनडीआरएफच्या मदतीने पुण्यामध्ये बचावकार्य सुरु असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या ठाण्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Share: