IMG-LOGO
राष्ट्रीय

जीव द्यावा लागला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नका; अरविंद केजरीवाल भावूक

Friday, May 31
IMG

तुरुंगात असताना त्यांनी अनेक दिवस माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं.

दिल्ली, दि. ३१ : दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी पुन्हा तुरुंगात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. देश वाचवण्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नका. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.'तुरुंगात असताना त्यांनी अनेक दिवस माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं. माझ्या रक्तातील साखर वाढली. तुरुंगात ५० दिवस होतो. या काळात माझं वजन ६ किलोनी कमी झालं. बाहेर आल्यानंतरही ते वाढलं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कदाचित हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असावं. यावेळी तुरुंगात माझा आणखी छळ केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन दिल्याबद्दल केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. न्यायालयानं दिलेली मुदत आता संपत आहे. मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे याचा मला अभिमान आहे. हे सरकार मला आणखी किती दिवस तुरुंगात ठेवेल माहीत नाही. पण माझा विचार पक्का आहे. ते मला गप्प बसवू शकत नाहीत. मला देश वाचवण्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी लोकांनी दु:ख करू नये, असंही ते म्हणाले.

Share: