निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
दिल्ली, दि. २९ : कोलकाता येथील डॉक्टर तरुणीचा बलात्कार व खून प्रकरणावर खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या घटनेमुळं मी व्यथित आणि भयभीत आहे. कोणत्याही सभ्य समाजात आया-बहिणींसोबत अशा प्रकारच्या क्रौर्याला स्थान असू शकत नाही. झालं ते खूप झालं. समाज म्हणून आपण सर्वांनी या प्रकारांविरोधात एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन मुर्मू यांनी केलं. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी कोलकाता प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. ‘कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत आहेत. हे चित्र अत्यंत दु:खद आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. 'निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बलात्काराच्या असंख्य घटनांचा समाज विसर पडला आहे. समाज म्हणून आपला हा सामूहिक स्मृतीभ्रंश चिंतेचा विषय आहे, अशी खंत मुर्मू यांनी व्यक्त केली. 'महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं आपण सर्वांनी मिळून हाताळली पाहिजेत. कोणताही पूर्वग्रह न बाळगता आपण आत्मपरीक्षण करून त्यावर बोलणं महत्त्वाचं आहे. काही कठीण प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवीत. विकृत मानसिकता अनेकदा स्त्रीकडे हीन माणूस, कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी बुद्धिमान म्हणून पाहते. वाईट याचं वाटतं की डॉक्टर, विद्यार्थी आणि नागरिक आंदोलन करत असतानाही काही गुन्हेगारी प्रवृत्ती इतर काही घटना घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.