विद्यार्थी असल्यापासून माझं त्यांच्याशी जमलं नाही. हे वस्तुस्थिती आहे.
मुंबई, दि. ३० : ‘अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत बसणं मला सहन होत नाही. त्यांच्या सोबत बसल्यानंतर मला ओकारी येते,’ असं खळबळ उडवून देणारं विधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. या विधानामुळं महायुतीमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे. तर, विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. मी माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ कधीच केली नाही. विद्यार्थी असल्यापासून माझं त्यांच्याशी जमलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. आज मी त्यांच्यासोबत (अजित पवार राष्ट्रवादी) मंत्रिमंडळात बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात. मी ते सहन करू शकत नाही,' असं सावंत यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी यावर काहीशी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. ‘तानाजी सावंत यांना उलट्या कशामुळं होतात माहीत नाही. ते आरोग्य मंत्री आहेत, त्यांच्या आरोग्याचा उलट्यांशी काहीतरी संबंध असेल. पण महायुतीत असल्यानं त्यांना ओकाऱ्या वगैरे होत असतील तर तसं कशामुळं होतंय हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील,’ असं मिटकरी म्हणाले.