मला तर पहिल्या शंभर दिवसातच जेलमध्ये टाकतील. हे मला माहीत आहे
वीटा, दि. ३० : राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर आम्ही जेलमध्ये असू…. मी तर बॅग भरून ठेवली आहे…पहिल्या १०० दिवसांच्या आतच सरकार मला जेलमध्ये टाकेल, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील वीटा येथील भाजप शहराध्यक्ष पंकज दबडे यांच्याकडून आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.नितेश राणे म्हणाले, ‘ राज्यात चुकून जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर तुम्ही लोक आम्हाला कुठे बघाल याचा विचार करा. आम्ही पुढील सहा महिन्यात आम्ही दोघे कोल्हापूरच्या जेलमध्ये गोट्या खेळत असू...आम्हाला ही लोकं काही बाहेर ठेवणार नाही. मला तर पहिल्या शंभर दिवसातच जेलमध्ये टाकतील. हे मला माहीत आहे. मी तर बॅगच भरून ठेवलीय. पण मी एक निर्धार केला आहे की महायुतीचं सरकार असंच जाऊ देणार नाही. मी मेहनत करेन, जिद्द दाखविन…दिवसरात्र महाराष्ट्र पिंजून काढेन…आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणून दाखविन. हे काही राजकारण्यांपुरतं राहिलेलं नाही. हा गँगवार सुरू झाला आहे’ असा आरोप नितेश राणे यांनी केलं.