लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्ली, दि. ३ : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल ६२.३६ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देशात विश्वविक्रम घडला आहे. कारण, या सात टप्प्यांत ६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल ३१ कोटी १४ लाख महिला मतदार आहेत. मतदानानंतरचा हिंसाचार रोखण्यासाठी पहिल्यांदाच संवेदनशील ठिकाणी निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दल आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी मतदानानंतरचा हिंसाचार थांबवतील.लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1952 पासून कोणत्याही लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोगाने मतदानानंतर किंवा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली नाही. यापूर्वी निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि 4 विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या.