IMG-LOGO
राष्ट्रीय

J&K Election Result 2024 : भाजपला धक्का; नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसला बहुमत

Tuesday, Oct 08
IMG

मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि अपक्ष उमेदवार गेमचेंजर ठरू शकतात.

श्रीनगर, दि. ८ : जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगताना दिसत आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार नॅशनल कॉन्फरन्सने ४१ जागा जिंकल्या असून एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. तर काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीने बहुमताचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे भाजप २७ जागांवर पुढे आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलानुसार मानले जात होते की, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि अपक्ष उमेदवार गेमचेंजर ठरू शकतात. मात्र असे होऊ शकले नाही. लडाखला वेगळं करणे तसेच आर्टिकल ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची ही पहिलीच अग्निपरीक्षा होती. मात्र भाजप काश्मीरच्या लोकांना हा विश्वास देण्यात कमी पडली की, त्यांच्या पक्षाचे सरकार लोकांच्या कल्याणासाठी असेल. भाजप ‘नवीन काश्मीर’ चा नारा देत होती, मात्र जनतेने यावर विश्वास ठेवला नाही. डोडा (पूर्व) विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवला आहे. मेहराज यांच्यामुळे आपने जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये खातं उघडलं आहे. मलिक यांनी या मतदारसंघात भाजपा, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीवर मात केली आहे. मलिक यांना २३,२२८ मतं मिळवली आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. पाठोपाठ त्यांनी गंदेरबल विधानसभा निवडणूकही जिंकली आहे. अब्दुल्ला यांनी तब्बल १०,५७४ मतांच्या फरकाने गंदेरबलवर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा फडकवला आहे. इडिया आघाडीने राज्यात बहुमत मिळवलं असून ओमर अब्दुल्ला लवकरच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.भाजपाचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरिंदर चौधरी यांनी रैना यांचा ७,८१९ मतांनी पराभव केला आहे.

Share: