लोकसभा निवडणुकीच्या या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात आज मुंबईतील पूर्ण सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ पासून मतदानास सुरुवात झाली आहे. तर देशात उत्तर प्रदेशमध्ये १३, पश्चिम बंगालमध्ये ७, बिहारमध्ये ५, जम्मू आणि काश्मीरमध्ये १, लडाखमध्ये १, झारखंडमध्ये ३, ओडिशातील ५ जागांवर लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह यांच्या लढतीकडे देशाचं लक्ष आहे. तर महाराष्ट्रात श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, वर्षा दरेकर राणे, राजन विचारे हे उमेदवार लढत देत आहेत. तर मुंबईतील सर्व सहा ठिकाणच्या लढतीमध्ये अरविंद सावंत, यामिनी जाधव, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड यांचं भवितव्य आज ठरणार आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे व अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात लढत होत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत आहे. धुळ्यात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात लढत रंगणार आहे.