विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
मुंबई, दि. २९ : गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने जनतेला खोटी आश्वासनं दिली, त्यांच्या खोट्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून महाराष्ट्रातील जनतेने भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत दणका दिला. या दणक्याने आता त्यांचे डोळे किलकिले झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यासाठी हे लोक नव्या आश्वसनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. त्यांनी जनतेला फसवण्याचा प्रयत्न केलाय, महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र रचलंय, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता सजग झाली आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली.आर्थिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या मागे राहिल्याची गोष्ट इथल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा अर्थसंकल्पांद्वारे काहीतरी धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला लुबाडायचं हे आता चालणार नाही. महाराष्ट्र आता जागा झाला आहे.”