महाराष्ट्रात देशा गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी आढळून आली आहे.
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टिने देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. राज्यात देशी गायींच्या संख्येत झपाट्याने घसरण होत आहे. देशी गायी एचएफ गायींच्या तुलनेत कमी दूध देत असल्याने शेतकऱ्यांना चारा-पाण्याचा खर्च परवडत नसल्याने देशी गायींच्या संवर्धनाकडे पशुपालकांचा कल कमी असतो. २०१९ साली झालेल्या २०व्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात देशा गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी आढळून आली आहे. २०१२ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणनेच्या तुलनेत महाराष्ट्रात गायींची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. देशी गायींच्या संवर्धनासाठी ‘राज्यमाता-गोमाता’ जाहीर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रती गाय प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल.