वसंत व्याख्यानमालेत स्व. बाबुराव हाके स्मृतीव्याख्यानात ते 'भारत वैश्वीक महासत्ता : महाराष्ट्राचे योगदान' या विषयावर बोलत होते.
नाशिक, दि. ११ : भारत हा नेहमीच महासत्ता होता, आहे आणि यापुढील काळातही राहील. त्यासाठी विदेशात राहणाऱ्या अनेक भारतीय तरुणांचे मोठे काम सुरू आहे. त्यातही महाराष्ट्र नेहमीच पुढे आहे. असे प्रतिपादन गर्जे मराठी फाऊंडेशनचे संस्थापक व सन फ्रान्सिस्को, अमेरिका येथील आनंद गानु यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. बाबुराव हाके स्मृतीव्याख्यानात ते 'भारत वैश्वीक महासत्ता : महाराष्ट्राचे योगदान' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. बाबुराव हाके यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. रविंद्र गाडगीळ, प्रा. अजित जावकर, आशुतोष देशपांडे, अभिजित देशपांडे, डॉ. ज्ञानदेव चोपडे व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. गानु म्हणाले की, परदेशात जाणारी माणसं आपल्या देशापासुन मात्र दूर गेलेले नसतात. मुळातच आज भारत एक महासत्ता हे विशेषण ऐकले तरी त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. अशाच यशस्वी लोकांच्या सहवासात काम करता यावे, त्यांना एकत्र करता यावे याच मुळ हेतुने आम्ही गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेची स्थापना केल्याचे सांगुन त्यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत थोडक्यात माहिती दिली. आताच्या काळात युध्द जिंकून महासत्ता बनता येणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करावे लागणार आहे. पण प्रत्यक्षात मात्र या निकषांवर महाराष्ट्र आजही अग्रेसर आहे. त्यातही नाशिकसारख्या शहरांनीही आपली छाप सोडलेली आहे. भगवान राम हा आपला इतिहास आहे आणि या इतिहासाने जगावर परिणाम केलेला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्राचे आणि भारताचेही चित्र वेगळे दिसले असते. हा जसा परिणाम आहे तसाच आणखी एक मोठा परिणाम म्हणजे देशाचा स्वातंत्र्य लढा महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. या इतिहासाप्रमाणेच आजही मराठी माणसं फेसबुक, टेस्ला यासारख्या कंपन्या सांभाळत आहेत. याशिवाय जगभरातील मोठमोठ्या पदांवर मराठी माणसं आहेत, त्यामुळेच मराठी आणि एकुणच भारतीय लोकांचे वर्चस्व आज संपुर्ण जगाला मान्य करावे लागत आहे. डॉ. अविनाश दीक्षित यांच्यासारख्या एका शिक्षकांच्या दोन विद्यार्थ्यांना नोबल पुरस्कार मिळतो, तरीही आपल्याला त्यांच्याबाबत फारशी माहिती नसते. अशी अनेक जणांची उदाहरणं देऊन त्यांनी परदेशात गेलेल्या महाराष्ट्रीयन माणसांचे तिकडे काय सुरू आहे याबाबतची जंत्रीच सादर केली. दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रमोद कापडणे प्रस्तुत 'चाँद छुपा बादल में' हा सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये मनोज दीक्षित, प्रीती दीक्षित, डी. एम. बोरसे, सविता खोडके, संजोग टिपरे व आरती ओक यांनी सुमधुर गाणी सादर केली. प्रमोद कापडणे यांनी निवेदन केले.