IMG-LOGO
नाशिक शहर

शंभर वर्षांतील स्थित्यंतरं टिपण्याची ताकद फक्त व्यंगचित्रातच : कुलकर्णी

Thursday, May 09
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यानात ते 'रेषा, भाषा आणि हंशा' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. ९ : शंभर वर्षांपूर्वीच्या व्यवस्थेनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आज आपल्याला सर्व सुविधा मिळत असल्या तरी ती संस्कृती आज बघायला मिळत नाही. ही सर्व स्थित्यंतरं टिपण्याची ताकद केवळ व्यंगचित्रकाराकडेच असते. असे प्रतिपादन मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यानात ते 'रेषा, भाषा आणि हंशा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. माधवराव काळे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. मंडलेश्वर काळे, धनंजय काळे  व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. कुलकर्णी  म्हणाले की, व्यंगचित्र कला ही दुर्मिळ कला आहे. कारण त्यात दोन कलांचा संगम असतो. एक म्हणजे चित्रकला आणि दुसरे म्हणजे विनोद बुद्धी. व्यंगचित्र म्हणजे सत्य सांगणारे चित्र होत. ऑलिंपिकमध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही कारण त्याच्या लोगोमथ्ये असलेल्या वर्तुळाकडे आपण शुन्य म्हणुन पाहतो, अशी संकल्पना मांडून ही मानसिकता बदलण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑलिंपिक पटूसआपण जिंकल्यानंतर प्रोत्साहन देतो. मात्र जिंकण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. असा दृष्टिकोन त्यांनी विविध चित्रांच्या माध्यमातून स्पष्ट केला. ते म्हणाले की आता तंत्रज्ञान बदलले आहे. हे बदल व्यंगचित्रकार टिपू शकतो. हे सांगताना त्यांनी तीन पिढ्यांचे प्रतिनिधी मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही बघतानाचे चित्र दाखविले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ नसुन क्रिकेट बघणे हा त्यांचा आवडता खेळ आहे. शतक बदलले त्या तारखेची गंमतही त्यांनी चित्रांच्या माध्यमातुन मांडली. दिव्या दिव्या दीपत्कार पासून सुरू झालेला आपला प्रवास हाऊ आर वंडर व्हाट यु आर' पर्यंत पोहचला असेही त्यांनी सांगितले. आजच्या संस्कृतीबद्दल जर कुणी शंभर वर्षांपूर्वी भाष्य केले असते तर कुणीही विश्वास ठेवला नसता. आज व्यंगचित्राच्या माध्यमातुन अशा कल्पना आपण मांडू शकतो असे सांगत त्यांनी समाज व्यवस्था, शिक्षण, पोषण आहार, आर्थिक विषय, मार्क्सबाद, संगणक क्रांती, वजनाची काळजी, यासारख्या विविध क्षेत्रांतील स्थित्यंतरं चित्रांच्या माध्यमातून मांडत रसिकांशी संवाद साधला. प्रसंगी वेगवेगळे अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले. आणखी दहा-पंधरा वर्षानी मुलं हस्ताक्षर म्हणजे काय असे विचारतील. त्याची उत्तरं आतापासूनच तयार ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. उत्तम आरोग्यासाठी रोज एक तरी व्यंगचित्र बघा, मनसोक्त हसा  असेही ते म्हणाले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज सुनिल आव्हाड प्रस्तुत 'एक धागा सुखाचा' हा बाबुजी अर्थात सुधीर मोघे, जयवंत कुलकर्णी, अरुण दाते व महेंद्र कपुर यांनी गायीलेल्या विविध सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे, विजय काकड, अँड. हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे,  यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share: