वसंत व्याख्यानमालेत स्व. अँड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यानात ते 'शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा' या विषयावर बोलत होते.
नाशिक, दि. ७ : शेतीवर अवलंबुन असलेली मोठी लोकसंख्या यातून बाहेर पडु पाहते आहे. मात्र या सर्वांना सामाउन घेऊ शकेल अशी क्षमता कोणत्याच क्षेत्रात नाही. त्यामुळे मोठी कोंडी झाली आहे. यातुन नैसर्गिकरित्या स्थलांतराचे चित्र आहे. हे रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन मोहाडी येथील सह्याद्री फार्म्सचे चेअरमन विलास शिंदे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. अँड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यानात ते 'शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. अँड. उत्तमराव ढिकले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्यांना रोज व्याख्यानास उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी यु-ट्युबच्या माध्यमातुन लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मनीष सानप यांनी प्रमुख वक्ते श्री. शिंदे यांचे स्वागत केले. डॉ. सुनिल ढिकले, संदीप शिंदे, प्रीतीश कारे व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा विषय जरा अवघड आहे. या निमित्ताने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, शेतकऱ्यांची आंदोलने, कांद्याचा विषय याच विषयांभोवती गुरफटलेले चित्र दिसुन येते. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात देशातील 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबुन होती. आज लोकसंख्या वाढली आणि हे प्रमाण 50 टक्क्यावर आले आहे. ही प्रक्रिया जगात सगळीकडेच दिसुन येते. आजची तरुण पिढी शेतिकडे वळण्यास तयार होत नाही. हा मोठा सामाजिक गुंता तयार होतो आहे. अगदी दहशतवादाचे मुळदेखील शेतीत आहे. आर्थिक दुरावस्थेतून हे घडत आहे. पंजाबसारख्या पुढारलेल्या व समृध्द असलेल्या राज्यांतसुध्दा यापेक्षा वेगळे चित्र नाही. अशा पार्श्वभूमीवर 'सह्याद्री'च्या माध्यमातुन शाश्वत व्यवस्था उभी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. जागतिकीकरण होत असल्यापासून शेतकऱ्यांची मानसिकताही बदलत आहे. शेतकऱ्यांना जसे सल्ले दिले जातात, तसे इतर कुणालाही दिले जात नाहीत. शेतकरीसुध्दा व्यावसाईक आहेत. मात्र तरुण पिढी शेतिकडे वळत नाही. हा खरा गुंता आहे. तो नैसर्गिक नसुन मानवनिर्मित आहे. सरकारच्या धोरणांचा हा परिपाक आहे. वास्तविक शेती हा नेहमीच फायद्याचा व्यवसाय आहे. कारण येथे एक दाणा पेरला तर त्याचे हजार दाणे होत असतात. मात्र सरकारच्या ढोंगीपणामुळेच शेतीचे नुकसान होत आहे. कांद्याचा प्रश्न एवढा कठीण आहे का? पण तो कुणाला सोडवायचाच नाही. त्यामुळे हा प्रश्न 44 वर्षांपासून चिघळत ठेवला जात आहे. अशीच परिस्थिती सर्वच शेतीमालाच्या बाबतीत आहे. दुधाचे भाव जसे काही प्रमाणात स्थैर्य आढळते, तसे कांद्याच्या बाबतीत का होत नाही? शेतीचे सगळे प्रश्न तांत्रिक आहेत. पण त्याकडे राजकीय दृष्टीने बघितले जात असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. जास्तीत जास्त डोकी आपल्याकडे पाहिजे या विचारातून राजकीय भूमिका घेतल्या जातात. त्यामुळे राजकीय ढोंगीपणा सोडावा लागेल, तरच शेतीला चांगले दिवस येतील असेही त्यांनी यावेळी नमुद केले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज गोल्डन व्हाईस स्टुडिओ प्रस्तुत 'मस्तीभरा समा' हा सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे, विजय काकड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.