वसंत व्याख्यानमालेत स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यानात ज्येष्ठ क्रीडा समीक्षक नितीन मुजुमदार यांनी आमीरची प्रकट मुलाखत घेतली.
नाशिक, दि. १० : गावातील तरुणांना क्रिकेट खेळणे, शिकणे सोपे व्हावे यासाठी गावात एक टर्फ सुरू केले आहे. आता अकादमी सुरू करण्याचा मानस जम्मु-कश्मीर येथील सुप्रसिद्ध दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसेन लोन (amir hussain lone) याने येथे व्यक्त केला. या सर्व प्रवासात मला आजीची खुपच मोलाची साथ मिळाली, असेही त्याने नमुद केले.वसंत व्याख्यानमालेत स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यानात ज्येष्ठ क्रीडा समीक्षक नितीन मुजुमदार यांनी आमीरची प्रकट मुलाखत घेतली.सुरेश कापडिया, शैलेश भोरे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला स्व. सदुभाऊ भोरे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. श्री. कापडिया यांनी आमीरचे स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मुलाखत सुरू करण्यापूर्वी आमीरच्या खेळाची काही प्रेरणादायी क्षणचित्रे चित्रफितीद्वारे माहिती दाखविण्यात आली. श्री. मुजुमदार यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देताना आमीरने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि क्रिकेटकडे वळल्याबाबत सांगत नाशिककरांशी संवाद साधला. एका अपघातात दोन्ही हात गमावल्याची हृदयद्रावक कहाणीही त्याने सांगितली. कुणी काहीही म्हटले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मंत्र माझ्या आजीने दिला. तर माझ्यासाठी आई-वडिलांनीही सारेकाही विकले. मला सतत प्रेरणा दिली. त्यामुळेच मी येथपर्यंत पोहचू शकलो. अत्यंत दुर्बल आर्थिक परिस्थितीत जिद्दीने शिक्षण पुर्ण केले. क्रिकेटर बनणे हे स्वप्न होते. मात्र हाथच नसल्यामुळे हतबल होतो. त्याकाळी घरापासून दुर एका घरात टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघायला गेलो. महत्प्रयासाने सचिन तेंडुलकरचा खेळ बघितला आणि कुणावरही अवलंबुन न राहता स्वतःचा खेळ विकसित करण्याचा निर्धार केला. पहिला सामना दिल्लीत केरळविरुद्ध खेळल्याचे सांगुन त्याने काही प्रसंगही कथन केले. या सामन्यात पहिल्याच चेंडुवर विकेट मिळाली आणि फलंदाजीतही 18 धावा काढुन नाबाद राहिलो. त्यावेळी झालेल्या कौतुकानंतर मागे वळुन बघितलेच नाही. सचिन तेंडुलकरशी पहिली भेट, मिडियाच्या समोर जातानाची मनस्थिती, सचिनने केलेले स्वागत व त्याच्याशी मारलेल्या गप्पा या विषयी त्याने सविस्तर चर्चा केली. ठाणे येथे झालेल्या आयएसपीएल स्पर्धेवेळचा प्रसंगही आपल्यासाठी सर्वाधिक गौरवशाली असल्याचे आमीरने सांगितले. आई- वडिलांचे आशीर्वाद सर्वांच्या जीवनात खुप महत्वाचे असतात. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्याला भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्याने यावेळी केले. आमीरची पत्नी शौकीत व इमाद या चार वर्षीय मुलाचाही यावेळी सत्कार करण्यात आला.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज संतोष फासाटे, सोनल पडाया व दिनेश पडाया आणि दीपक चौधरी यांनी 'किस्से, नगमे और तराने' हा संगीतमय कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे, विजय काकड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.