वसंत व्याख्यानमालेत स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यानात ते 'भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने!' या विषयावर बोलत होते.
नाशिक, दि. १३ : शाश्वत विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक बाबींचा विचार अपेक्षित असतो. आपला देश सध्या विकासाच्या दिशेने वेगात निघाला असला तरी हा वेग फक्त आर्थिक विकासाच्या बाबतीतच जास्त आहे. अन्य मुलभूत बाबीकडे मात्र आपण सर्रास दुर्लक्ष करतो आणि हीच आपल्या देशापुढे असलेली सर्वात मोठी आव्हाने आहेत. असे प्रतिपादन स्वीडन येथील ज्येष्ठ शिक्षण व सार्वजनिक आरोग्यसेवा तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यानात ते 'भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने!' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उषा तांबे यांनी स्वागत केले. आनंद अग्रौचे चेअरमन उद्धव आहिरे, उद्योजक अविनाश गोठी, डॉ. प्रदीप पवार व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. विखे पाटील म्हणाले की, आपला देश विकासाच्या दिशेने वेगाने निघाला आहे. परंतु या वाटचालीतील काही आव्हाने आणि शाश्वत विकास म्हणजे काय याचा विचार होणे गरजेचे आहे. जर आपल्याला चांगले भविष्य घडवायचे असेल तर भावी पिढ्यांनी संधीशी तडजोड करू नये. शाश्वत विकासाच्या 17 उद्दीष्ट्यावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. पर्यावरण, आर्थिक विकास आणि सामाजिक विकास हे शाश्वत विकासासाठी महत्वाचे असते. मात्र आपण यापैकी फक्त आर्थिक बाबतीतच वेगात धावतो आहोत. त्याचवेळी आरोग्याचा सर्वच बाबींवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्यावर थेट परिणाम करणाऱ्या बाबींचा केंद्रबिंदू हे आरोग्यच आहे. हा मुद्दा समजण्यासाठी त्यांनी विविध देशांतील तुलनात्मक आकडेवारी चित्रफितीद्वारे सादर केली. आपल्या देशात आजही मुलींची कमी वयात लग्न करण्याचे प्रमाण मोठे आहे. याचाच अर्थ आपल्याकडे स्त्री शिक्षण, आरोग्य, बालमृत्यू या सारख्या गोष्टींकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. प्रत्याक्षात मात्र सरकारी आकडेवारी फुगवून सांगत सारे काही आलबेल असल्याचा देखावा उभा करतो. परिणामी आपल्या देशाकडे जग मागासलेला किंवा अल्प उत्पन्न असलेला देश म्हणूनच बघत आहे. यात सुधारणा करायची असेल तर आपल्याला आजही खुप काम करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी 2009 ते 2019 या दहा वर्षांतील आकडेवारी मांडत आरोग्य क्षेत्रात आपण कसे मागे पडत गेलो हे समजाऊन सांगितले. त्याचवेळी मुलींच्या जन्मदरातील तफावतही त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केली. याशिवाय शुध्द पाण्याची ऊपलब्धता, आरोग्यसेवा, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबतही त्यांनी सविस्तर उहापोह केला. ते म्हणाले की आपणच आपल्या समस्या निर्माण करत आहोत. मेडिकल रिप्रेझेण्टिव्ह, जर्नल्स आणि वृत्तपत्रात छापून आलेली माहिती हेच जर खासगी डॉक्टरचे माहितीचे स्त्रोत असतील तर आरोग्यसेवा सुदृढ कशी राहील? शिक्षणाच्या बाबतीतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. देशातील 9 टक्के शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा नाहीत. या क्षेत्रातही मागील दहा वर्षांत सरकारने काहीच काम केलेले नाही.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हेमंत काळे प्रस्तुत अफलातुन म्युझिक लव्हर्स ग्रुपतर्फे दादा कोंडके हिटस हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये श्री. काळे यांच्यासह सुरभी गौड, मीनाक्षी भुतडा व वैष्णवी पगारे यांनी दादा कोंडके यांची गाजलेली सदाबहार गीते सादर केली. संतोष फासाटे यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.