नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही.
नागपूर, दि. २८ : मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे. आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल.असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी नेमकी कोणती घटना जबाबदार होती. त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नौदल देणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही पोलिसांत एफआयआर दाखल केलेला आहे. नौदलाच्या अहवालानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहिर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल. ही घटना घडल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केले जात आहे. तरीही विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. नारायण राणे यांनी पत्रकार आणि पोलिसांना धमक्या दिल्या, असाही प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही.