दादर आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरु झालेल्या आयटीआयमधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला.
मुंबई, दि.२१ : आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, मुख्य कार्यालय, ६, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय, ३६ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आणि कार्यालय, ४३ मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्रासह राज्यातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला.आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी. या उद्देशानेच कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा यांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक आयटीआय मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्थानिक योग प्रशिक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ध्वनिचित्रफितींची मदत घेण्यात आली. या कार्यक्रमामुळे योग साधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होईल. त्यातून आरोग्यदायी सवय त्यांच्यात निर्माण होईल, असा विश्वास मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्यांच्यामुळे जगभर भारतीय संस्कृतीचा जागर झाला आहे. जगातील अनेक देशातील नागरिक योग साधना आत्मसात करीत आहेत. आपणदेखील आपली संस्कृती विसरता कामा नये. तरुण पिढीने हा वारसा पुढे नेला पाहिजे. या वेगवान जीवनातसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे कौशल्य त्यांनी अंगिकारायला पाहिजे. त्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना म्हटले आहे.राज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि मुंबईसह हा कार्यक्रम ३६ जिल्ह्यात साजरा करण्यात आला. दादर आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरु झालेल्या आयटीआयमधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला. तसेच आयटीआय, रत्नागिरी येथे योग शिक्षक विश्वनाथ वासुदेव बापट (वय वर्षे 73) हजर होते. येथे योग दिनाचे औचित्य साधून खुल्या जिमचे उद्घाटन करण्यात आले.