IMG-LOGO
नाशिक शहर

एआय'ची भीती बाळगण्यापेक्षा त्यावर विचार करावा : जावकर

Friday, May 10
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यानात ते 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास (आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI) या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि.   १० :  आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'एआय'ला घाबरण्याची गरज नाही. मात्र त्याची माहिती आतापासूनच असणे गरजेचे आहे. कारण भविष्यात एआय प्रत्येक क्षेत्रात काम करणार आहे. याशिवाय येत्या दोन तीन वर्षांत सर्वच बाबींचा वेग वाढणार आहे. त्यादृष्टीने विचार आणि तयारी ठेवल्यास एआय ही मानवाला मिळालेली मोठी देणगी ठरू शकते, असे प्रतिपादन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन येथील प्रा. अजित जावकर यांनी आज येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यानात ते 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास (आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI) या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. प्रा. सुरेश मेणे  यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. रंजन ठाकरे, श्री. सुभाष मुसळे, रवींद्र मानके, मोहंमद आरिफ खान व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. प्रा. जावकर म्हणाले की, एआयमुळे काय होईल ही जगाला वाटत असलेली भीती प्रत्यक्षात मात्र  निरर्थक आहे. वास्तविक शेतीसारख्या क्षेत्रातील जटील समस्या सोडविण्यासाठीही एआय उपयुक्त आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारातही याचा उपयोग होऊ शकतो. एआय तुमच्या नोकऱ्या खाणार नाही, तर ज्यांना एआय समजेल तोच या क्षेत्रात काम करू शकेल. ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चित्रफितीद्वारे विविध उदाहरणे दिली. एआय कसे काम करतो हेदेखील त्यांनी विविध उदाहरणाद्वारे माहिती दिली. एआय अद्याप मेन स्ट्रिममध्ये नाही. त्यामुळे त्याला त्रोटक प्रश्न विचारले तर तो चुक करू शकतो. त्यामुळे तो गेम चेंजर आहे. येणारा काळ कोडींगचा असला तरी त्यासाठी आतापासून कोडींग शिकण्याची गरज नाही. भविष्यात हे काम एआय करेल. त्याला फक्त आदेश द्यावा लागेल. त्यामुळे त्याचा परिचय असणे गरजेचे आहे. आज आपल्याला जे दिसतंय त्याचा येत्या दहा वर्षांत होणारा परिणाम म्हणजे एआय असेल. भविष्यात संशोधन क्षेत्रात गुंतवणुक खुपच मोठ्या प्रमाणावर फायद्याची ठरणार आहे. संशोधन, नियम, शिस्त, विचार, माईंड सेट, नियंत्रण, संस्कृती या साऱ्यांचा एकत्रित परिणाम एआय वर होणार आहे.त्यातही नॉलेजचा खुप उपयोग होणार आहे. त्यामुळे विशेषतः तरुण मंडळी व लहान मुलांनी आतापासूनच एआय, कोडींग यासारख्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तसेच एआय आणि भावनिकता, वयस्कर लोकांच्या भावना, एकत्रित क्षमता, सामाजिक जाणिवा आदींचाही विचार करावा लागणार आहे. कारण एआयचा हा प्रवास कुठे जाऊन संपेल हे आजमितीस कुणीही सांगू शकणार नाही. मात्र तो स्वतः सारे काही नियंत्रित करू शकतो, एवढी क्षमता त्यात आहे. म्हणूनच सायबर सिक्युरिटी अँड एआय हा अभ्यासक्रम नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज प्रीती दीक्षित व डी. एम. बोरसे प्रस्तुत 'सदाबहार हिटस' हा सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सौ. दीक्षित व श्री. बोरसे यांच्यासह मनोज दीक्षित, रोहिणी पांडे, किरण गोसावी, मनुजा रत्नपारखी, प्रमोद कापडणे यांनी सादर केला.

Share: