IMG-LOGO
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत; त्यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो : मोदी

Friday, Aug 30
IMG

श्री. मोदी यांनी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली.

पालघर, दि. ३० : मालवणमध्ये जे झालं ते अतिशय वेदनादायी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणात नतमस्तक होऊन माफी मागतो. या घटनेमुळे शिवभक्तांच्या मनाला ठेस पोहचली आहे. त्यांचीही मी माफी मागतो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी यावेळी उपस्थित होते.काय म्हणाले नरेंद्र मोदी ? सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली. सिंधुदुर्ग येथील घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो, असे सांगून प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर मी सर्व प्रथम रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केली होती. भक्तिभावाने आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी आराध्य दैवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Share: