पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
बदलापूर, दि. २० : बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली.घटनेचे गांभीर्य न ओळखता दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.