दीक्षाभूमीनंतर नागपूरला जागतिक लौकिकात आणल्याचे काम सुलेखाताईंनी ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून केले आहे.
नागपूर, दि. १३ : भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या मार्गावर चालण्यातच जगाच्या कल्याणाचा मार्ग दडला आहे. आजचा दिवस हा संकल्प घेण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथी गृहाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर व मान्यवर उपस्थित होते. दीक्षाभूमीनंतर नागपूरला जागतिक लौकिकात आणल्याचे काम सुलेखाताईंनी ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून केले आहे. संपूर्ण जीवन त्यांनी धम्म प्रचारासाठी समर्पित केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक नागपूरला भेट देतात. या भेटीत ते आवर्जून ड्रॅगन पॅलेसलाही भेट देतात. येथील स्वच्छता व निगा उत्तम असल्याने स्वाभाविकच याला एक विशेष महत्त्व आहे. आज योगायोगाने सुलेखाताईंचा जन्म दिवस असून ताईंच्या सर्व उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.