कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
नाशिक, दि. १३ : जरांगे यांनी राज्यात काढलेल्या मराठा आरक्षण शांतता फेरीचा मंगळवारी नाशिकमध्ये समारोप झाला. शहरात सात किलोमीटरची शांतता फेरी काढण्यात आली. दरम्यान मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वांनाच परिचित आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तामुळे फार्म हाऊसला छावणीचे स्वरूप आले. भुजबळ समर्थक गजु घोडके हे जरांगे यांना संविधानाची प्रत देणार होते. मात्र पोलिसांनी घोडके यांना त्यांच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेतले. सायंकाळी उशीरापर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी-मराठा समाजात तेढ निर्माण करीत असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. हे षडयंत्र मराठा समाजाने यशस्वी होऊ द्यायचे नाही. ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी समाज एकत्र असून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा आरक्षणाचा चेंडू परस्परांकडे टाकण्याचा खेळ सुरू केला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.