IMG-LOGO
नाशिक शहर

तर्कशुद्ध विचार हे बालपणीच आपल्या मुलांवर बिंबवले पाहिजे : पवार

Wednesday, Oct 02
IMG

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना समाजसेवेसह समाजप्रबोधनाचे श्याम मानव यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे.

नाशिक, दि. २ :  अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर अनेक संत-महामानवांनी वैविधांगी विचार मांडले आहेत. या विचारांचा सार 'शोध : श्याम मानवांचा' या शोधग्रंथात आहे. असे तर्कशुद्ध विचार हे बालपणीच आपल्या मुलांवर बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन अमळनेरच्या साने गुरुजी प्रतिष्ठानच्या सचिव आणि सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केले.     सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित आणि डॉ.नारायण पाटील लिखित 'शोध : श्याम मानवांचा' या शोधग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाध्यक्ष कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खा.भास्करराव भगरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, संचालक प्रवीण जाधव, माजी आ.नानासाहेब बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.विलास देशमुख, प्राचार्य डॉ.वेदश्री थिगळे, युवा शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, दिंडोरी कृउबा सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, संचालक गंगाधर निखाडे, दिंडोरी खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन रघुनाथ पाटील, माजी उपमहापौर ॲड.मनीष बस्ते, दिंडोरी ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तुषार वाघ, ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.गडाख, प्रकाशक विलास पोतदार, वत्सला पाटील, शारदा पाटील मंचावर उपस्थित होते.     पवार पुढे म्हणाल्या की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना समाजसेवेसह समाजप्रबोधनाचे श्याम मानव यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. अनेक आव्हाने स्वीकारत समाज प्रबोधनाचे कार्य शांतपणे आणि चिवटपणे करावे लागते. असे कार्य श्याम मानव यांनी सातत्याने केले आहे. अशा विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. खा.भास्करराव भगरे, ॲड.नितीन ठाकरे, कार्यक्रमाध्यक्ष श्रीराम शेटे आदींसह लेखक डॉ.नारायण पाटील यांनीही विचार मांडले. वक्त्यांचा परिचय जयश्री वाघ यांनी करून दिला. प्रास्ताविक डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले. आभार शारदा पाटील यांनी मानले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share: